कोरेगाव भीमातील घडामोडींवर जिल्हाधिकाऱ्यांची नजर

शिरूर तालुका

सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर करडी नजर

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे स्वतः सदर ठिकाणी तळ ठोकून उपस्थित असताना सर्व घडामोडींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवून होते.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर प्रशासन विशेष खबरदारी घेत असून नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्यात येत असतात. सदर ठिकाणी शासनाच्या वतीने अनेक सीसीटीव्ही बसवून त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी करडी नजर ठेवून कोठे काही त्रुटी आढळून आल्यास त्या जागेवर सोडवण्यासाठी देखील प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.

कोरेगाव भीमा येथील सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेले असताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे हे सदर ठिकाणी उपस्थित राहून सर्व घडामोडींवर व हालचालींवर नियंत्रण ठेवून होते त्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून प्रशासनाला आढळून आलेल्या त्रुटी तातडीने सोडवण्यात देखील यश आले आहे.