निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एका बोअरवेल मध्ये पडलेल्या 2 घोरपडींना एका वकिलाच्या सतर्कतेने जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणीमित्रांना यश आले असून एका वकिलाच्या सतर्कतेने दोन घोरपडींचे प्राण वाचले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अ‍ॅड. गणेश शिर्के यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटार बंद पडल्याने त्यांनी मोटार बाहेर काढून ठेवली होती. दुपारच्या सुमारास अ‍ॅड. शिर्के हे शेतात गेले असता त्यांनी बोअरवेल मध्ये पाहिले असता त्यांना आत मध्ये दोन साप असल्याचे जाणवणे त्यांनी तातडीने इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेरखान शेख यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना बोअरवेल मध्ये 2 घोरपड असल्याचे दिसून आले.

यावेळी सर्पमित्र शेरखान शेख यांनी अ‍ॅड. गणेश शिर्के, महेंद्र शिर्के, प्रवीण बामणे यांच्या मदतीने एका पाठोपाठ एक अशा दोन्ही घोरपडींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर याबाबतची माहिती शिरुर वनविभागाने वनरक्षक प्रमोद पाटील यांना देत सदर घोरपडींना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. दरम्यान बोअरवेल मध्ये पडलेल्या घोरपडींना अगदी कमी जागेतून बाहेर काढून जीवदान दिल्याने अ‍ॅड. गणेश शिर्के यांनी सर्पमित्र शेरखान शेख यांचे आभार मानले.