शिरूर तालुक्याच्या बेट भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): गेली दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला असून मोठ्या प्रमाणात पशुधनही धोक्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिंपरखेड (ता. शिरूर) येथे मागील आठ दिवसांपासून दाभाडेमळा, बोऱ्हाडेवस्ती, दातेवस्ती आदि ठिकाणी आपल्या बछड्यांसह बिबट्यांचा समूह नागरीकांना दिसून येत आहे अशातच तीन दिवसांपासून पिंपरखेड परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांसह शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड येथील शेतकरी कचर बोंबे यांच्या भुईमुगाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांच्या दिशेने बिबट्या डरकाळी फोडत आल्याची घटना घडली आहे.

शेतात पाणी भरणारे शेतकरी हिरामण बोंबे, बाळासाहेब बोंबे, दत्तात्रय बोंबे, पोपट बोंबे, पांडुरंग बोंबे यांनी एकत्रित तीन ते चार बिबटे समूहाने पहिल्याने शेतकऱ्यांसह महिला शेतमजूर बिबट्याच्या भीतीने धास्तावले असून दिवसा देखील शेतात काम करण्यासाठी मोठी भीती निर्माण झाली आहे. यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरे लावण्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे यांनी केली आहे.

गेली दोन दिवस याच परिसरात दिवसाढवळ्या समूहाने बिबट्यांचा संचार वाढला असल्याने मागील वर्षात झालेल्या हल्ल्यांचे गांभीर्य लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना घडून नये यासाठी वनविभागाने बिबट मुक्त संचार हि बाब गांभीर्याने घेऊन पिंजऱ्यांची संख्या वाढवून तातडीने बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाळ्यातील दिवसांत अन्नाच्या शोधात बिबट्याचा वावर वाढला आहे. आधीच्या काळात अनेक पाळीव पशुधनावर बिबट्याने हल्ले करून आपले भक्ष्य बनवले असल्याने शिवारातील श्वानांसह, कोल्हे, ससे यांसह इतर प्राण्यांची संख्या घातल्याने बिबट्या आता दिवसाढवळ्या भरवस्तीत आपला मुक्त संचार वाढवू लागला असल्याने जर त्यास भक्ष्य मिळाले नाही तर तो थेट मनुष्यावर हल्ला चढवू शकतो अशी भीती निर्माण झाल्याने तातडीने पिंजरे लावण्याची गरज असून वनविभागाकडून तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे.

सदरच्या भागात चहुबाजूने मोठ्या प्रमाणात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण झालेली आहे. येथील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबटप्रवण क्षेत्रात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्या मुक्त संचार करत असल्याने पुढील दुर्घटना टाळण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. किंवा वाइल्डलाईफ च्या माध्यमातून ड्रोन कॅमेरे बसवून या भागात बिबटे कॅमेरामध्ये निर्देशित करावेत. सर्वेक्षण व स्थळपाहणी करून योग्य ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.