ST

पुणे केंदूर PMPL बससेवा पुन्हा सुरु होणार: दत्तात्रय झेंडे 

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली PMPL बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना ग्रामस्थांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर सदर बस सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती PMPL चे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

केंदूरसह शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु PMPL बसच्या अनेक सेवा तोट्याचे कारण पुढे करत पीएमपीएल विभागाने बससेवा बंद केल्याने या परिसरातील गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अनेक वर्षांपूर्वी माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या प्रयत्नाने पुणे मनपा केंदूर बससेवा सुरु झाली होती. परिसरात उच्च शिक्षणाची सुविधाच नसल्याने अनेक वर्षांपासून या भागातून पाबळ, शिक्रापूर, कोरेगाव, जातेगाव, वाघोली येथे शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने जात होते.

अचानक बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल सुरु झाले. त्यामुळे माजी सरपंच बाबुराव साकोरेंसह पदाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे, वाजेवाडीचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी खासदार गिरीश बापट यांच्याकडे, सुर्यकांत थिटे यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेकडे पाठपूरावा सुरु ठेवला.

यावेळी खासदार आमदार यांनी PMPL व्यवस्थापन यांना विनंती केल्याने अखेर व्यवस्थापनाने आपला बससेवा बंदचा निर्मय मागे घेत पुढील दोन दिवसात पुणे केंदूर बससेवा पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या मार्गातील प्रवाशांना प्रवासासाठी अन्य कुठलीच वाहतूक व्यवस्था नसल्याने सदर निर्णय घेतल्याचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.