sandeep kute

पुणे जिल्हा माथाडी मंडळ बरखास्त करा; संदीप कुटे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्हा बहुसदसीय माथाडी मंडळाकडून रांजणगाव एमआयडीसीतील औद्योगिक पट्ट्यात बरीच बेकायदेशीर कामे झाली आहेत, असा आरोप मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप कुटे यांनी केला आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये चुकीच्या व बोगस पद्धतीने माथाडीची वसुली करण्यात येत असल्याने हे माथाडी मंडळ बरखास्त करुन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत भेटून केली आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असुन पुणे जिल्हा माथाडी कामगार मंडळामध्ये काही पक्षीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक कंत्राटदारांनी रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांची कुठलीही संमती न घेता बेकायदेशीर नोंदणी केली आहे. तसेच बऱ्याच कंपन्यांमध्ये नोंद असलेल्या कामगारांच्या हक्काचे काम हिरावून घेऊन त्या कामगारांची कुठलीही संमती न घेता बेकायदेशीर नोंदी करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला आहे.

पुणे जिल्हा माथाडी मंडळानेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. उलट गैरकृत्य करणाऱ्या स्थानिक कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे मदत करून माथाडी कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे जिल्हा बहुसदसीय माथाडी मंडळ बरखास्त करुन यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी व महामंडळामध्ये चांगल्या लोकांना संधी देण्यात यावी, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. याबाबत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सोबत लवकर बैठक आयोजित केली असल्याचे संदिप कुटे यांनी सांगितले.