शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात ब्लॉक काढण्यासाठी, रस्ता केसेस १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी फाईल्स अशा विविध प्रकारच्या संकलनाची अनेक कामे लक्ष्मीदर्शन न दिल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक मानसिक त्रास होत आहे.

 

एक नायब तहसिलदार ब्लॉक काढण्यासाठी, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेससाठी अडवणुक करुन अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करत आहेत. याबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात असुन काही नागरीकांडून ब्लॉक काढण्यासाठी तब्बल 50 हजार रुपये घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. अनेक एजंट यासाठी कार्यरत असुन मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. याला आळा न बसल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

 

काही महीन्यांपुर्वी शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यासह 4 जणांवर लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिरुरच्या महसुल विभागाची खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. पुन्हा तोच प्रकार शिरुर तहसिल कार्यालयात घडत आहे.

 

शिरुर तहसिल कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोडावून मधून भरलेल्या अनेक ट्रकमधून माल लंपास करुन त्याची थेट काळ्या बाजारात विक्री होत आहे. तसेच तालुक्यातील रेशन दुकानदार गोलमाल करुन गरीबांचे धान्य काळया बाजारात विकत आहे.

 

तसेच काही दिवसांपुर्वी संजय गांधी, विधवा, परीतक्त्या निराधार योजनेसाठी बोगस दाखले, अधिकाऱ्यांच्या सहया केलेली प्रकरणे उघडकीस आलेली असताना गुन्हा दाखल करायला तहसिलदार का टाळाटाळ करतात याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही.
(क्रमश)…