अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

क्राईम मुख्य बातम्या

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा

शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने व तो सुजाण नागरीकाच्या हातात पोहचल्याने त्यांनी वरीष्ठांकडे याची पोलखोल केल्याने त्याचा खरा चेहरा समोर येवून त्याची उपअधिक्षक पदावर बढती होण्यापुर्वीच निलंबनाची वेळ आली आहे.

दरम्यान, गोकावे याच्या निलंबनाची बातमी येताच नागरीकांनी सुप्यात फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. सुपा पोलिस ठाण्यात 2 वर्षे पुर्ण झाल्याने नितिन गोकावे याची बदली होणार होती. बदली होणार असल्याचे 2 वर्षे गोकावेचा त्रास सहन करणाऱ्या व्यावसायिकांनी संघटीत होत हप्ते देण्यास नकार दिला. व तेथूनच गोकावेच्या पतनास सुरूवात झाली. हप्ते न मिळाल्याने बेकरी, हार विक्रेते तसेच पान टपरी व्यवसायिकांना रात्रीच्या वेळी पोलिस फौज फाट्यासह येऊन गोकावे हा दमदाटी करीत होता. ही माहिती समाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात जाब विचारला.

दोन वर्षे सुप्यात पोलिस निरीक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यावेळी रात्रीच्या वेळी उघडी असणारी दुकाने तुम्हाला दिसली नाहीत का? तरुण व्यवसायिकांकडून सक्तीने हप्ते वसुल करण्यात येत होते. या महिन्यात हप्ते मिळाले नाहीत म्हणून तुम्हाला नियमांचा साक्षात्कार झाला का असा रोखठोक सवाल रोकडे यांनी केला. हप्तेखोरीचा थेट आरोप होऊन, या बाचाबाचीचे चित्रीकरण होत असताना गोकावे याने मी हप्ते घेत नसल्याचा इन्कारही केला नाही. गोकावे यांनी सुपा पोलिस स्टेशनमध्ये अनेक जणांवर खोटे गुन्हे दाखल केले असून सामान्य नागरीकांकडून, व्यावसायिक यांच्याकडून आर्थिक लाभ न मिळाल्यास विनाकारण नाहक गोवले आहे.

यामुळे गोकावेविरोधात संतापाची लाट निर्माण झालेली असतानाच म्हसणे फाटा टोल नाक्यावर गोकावे एका महिलेस मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सगळीकडे मोठया प्रमाणावर व्हायरल झाला. त्याची गंभीर दखल राज्याच्या गृह विभागाने घेत गोकावे यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गोकावे याची नियत बदली सुप्याहून नगर येथे केल्याचे आदेश आला होता. मात्र काही तासातच गोकावे याच्या निलंबनाचे वृत्त येताच सुप्यात नागरीकांनी एकत्र जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

गोकावे यांची फेब्रुवारीअखेर बदली होणार होती. त्याची माहीती व्यवसायिकांनाही होती. फेब्रुवारीचा हप्ता न देण्यावर एकमत झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या वसुली बहाद्दर पंटरकडे हप्ताच दिला नाही. परीणामी संतप्त गोकावे यांनी जाता -जाता वसुली करण्यासाठी स्वतःच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. व तोच त्यांच्या अंगलट आला. कदाचित व्यवसायिकांना अंगावर घेतले नसते तर नागरीकांना मोठा जाच करूनही ते सहीसलामत निघून जाऊ शकले असते. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. ऐतिहासीक वारसा आलेल्या सुप्यातच गोकावे याचा पर्दाफाश होऊन त्यास थेट निलंबनास सामोरे जावे लागले.

गोकावे याची लवकरच पोलिस उपअधिक्षक म्हणून बढती होणार होती. बढतीपूर्वीच त्याने पोलिस अधिक्षक पदासाठी आवश्यक ड्रेस शिवून घेतला होता. लवकरच पोलिस अधिक्षकाच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न पाहत असलेल्या गोकावे याचा सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुबाबही वाढला होता. बदलून गेलो, बढती झाली तरी मी नगर जिल्हयातच बसणार आहे. तशी सेंटींग लावली आहे. तुमच्याकडे पाहून घेईल अशी धमकी गोकावे सुप्यातील नागरीकांना देत होता.

हप्तेखोरी, महिलेस मारहाण तसेच कथीत नाजूक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या गोकावे याची बदली झाल्यानंतर त्याने बुधवारी सकाळी सुपा पोलिस ठाण्यात स्वतःच्याच निरोप समारंभाची तयारी केली होती. सुप्यात तसे आमंत्रणेही पाठविण्यात आली होती. मात्र बहुतेकांनी या आमंत्रणाचा अव्हेर केला. बदनामी होऊनही निरोप समारंभाचे आयोजन करणे म्हणजे ‘ गिरे तो भी टांग उरप’ असाच प्रकार असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या.

लवकरच डीवायएसपी म्हणून रूजू होण्याची गोकावे याला आस लागली होती. ही स्वप्ने पाहत असतानाच महिलेस मारहाण केल्याप्रकरणी निलंबन झाल्याने सध्यातरी त्याच्या प्रमोशनवर पाणी फेरले गेले आहे. प्रमोशनसाठी अगोदरच तयार करून ठेवलेला ड्रेस मात्र त्याला काही महीने तरी चांगला सांभाळून ठेवावा लागेल.

सामान्य नागरीक सोडा, कर्मचाऱ्यांनाही गोकावे याचा चांगलाच जाच होता. स्वतःच्या मर्जीप्रमाणे कर्मचाऱ्यांना डयुटी लावणे, रजा नाकारणे यासह विविध कारणांमुळे सुपा पोलिस ठाण्यातील कर्मचारी दबावाखाली होती. गोकावेची बदली झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या व्यवस्थापनाला वेठीस धरून गोकावे याने हुक लावत शाळेची आर्थिक कुवत नसतानाही मोठी रक्कम उकळल्याची माहीती पुढे आली आहे. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांनाही धाक दाखवून लुटल्याची चर्चा सुप्यासह शिरुर तालुक्यात होत आहे. एकुणच त्या नाजुक प्रकरणासह नागरीकांना दिवसाढवळ्या खाकीच्या धाकाने लुटणाऱ्या लुटारूचा पर्दाफाश होऊन निलंबन झाल्याने सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी निश्वास सोडला आहे.