ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्रियतेकडे शिरूर पोलीस विभागाचा गंभीर वाटचाल 

शिरूर तालुका

ग्रामस्तरावर CCTV, सुरक्षा दल सक्रीय करण्याचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येत असून,दि. ०७ रोजी शिरूर तहसील कार्यालयातील तिसरा मजला येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रशांत ढोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संदेश केंजळे यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ व पत्रकारांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आणि सूचना देण्यात आल्या

ग्राम सुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करावी

प्रत्येक गावाने आपल्या पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून चोख नियंत्रण ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या सुरक्षा दलांना रात्री गस्तीसाठी पुन्हा सक्रीय करण्यात यावे. त्यासाठी योग्य नियोजन व जबाबदारी देण्यात यावी.गावाच्या प्रवेशद्वार, मुख्य रस्ते, शाळा, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांमध्ये CCTV कॅमेरे बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवावे. सुरक्षा दल व यंत्रणांना बळकटी

सद्यस्थितीत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी, यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा व दल अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस उपस्थित असलेल्या विविध गावांतील पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच स्थानिक स्तरावर याची अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे संकेत दिले गेले.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे बैठकीस उपस्थित सर्व प्रतिनिधींनी ग्राम सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे निश्चित करत पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

शासन, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांचा संयुक्त सहभाग हाच सुरक्षित गावांचे मूळ सूत्र असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.