Shingade Marriage

शुभविवाह वेळेत लावणाऱ्यांचा आदर्श घ्यावा: डॉ. रत्नाकर महाजन

शिरूर तालुका

शिक्रापूर: प्रत्येक शुभ कार्य वेळेत झाले पाहिजे अशी सामाजिक भावना सर्वांचीच निर्माण झाली पाहिजे. अलीकडील धावपळीच्या काळात अनेक शुभविवाह वेळेत लागत नाहीत. कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले पाहुणे वेळेपूर्वी लग्नाला येत असतात, त्यातच वेळेत लग्न न लागल्याने सर्वजण त्रासून जातात. अगदी वेळेत लग्न लावणाऱ्यांचा समाजाने आदर्श घेऊन तशी कृती आचरणात आणण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा, असे मत राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले. केडगाव (ता. दौंड) येथील वेळेत लागणाऱ्या एका लग्नात डॉ. महाजन बोलत होते.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार प्रा. नागनाथ शिंगाडे यांची कन्या अमृता आणि पणदरे (ता. बारामती) येथील राजाराम लकडे यांचे चिरंजीव सुरज (सध्या जर्मन स्थित) या उच्चशिक्षितांचा लग्न सोहळा नुकताच केडगाव (ता. दौंड) येथील एका मंगल कार्यालयात संपन्न झाला.

लग्नाची वेळ ४.५५ मिनिटांची होती. सभागृहामध्ये लग्न कार्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळेत लग्न लागावे अशी भावना दोन्ही परिवाराकडून होती. त्यातच राष्ट्रवादीचे नेते योगेश जगताप यांच्या पुढाकाराने वेळेत लग्न लागावे म्हणून सर्वच मान्यवरांची शुभ आशीर्वादाची भाषणे रद्द करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना शुभ आशीर्वाद देण्यास सर्वानुमते संमती देण्यात आली आणि बरोबर वेळेत शुभविवाह संपन्न झाला. यावेळी सर्वच उपस्थितांनी वेळेत लग्न लागले म्हणून समाधान व्यक्त केले. यावेळी जावई पोशाख, मान्यवरांचे शुभाशीर्वाद, सत्कार समारंभ आदींना फाटा देऊन दोन्ही परिवाराकडून वेळेत शुभविवाह लावण्यात आला.

राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार पोपटराव गावडे व रंजना कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वाती पाचुंदकर, रेखा बांदल व कुसुम मांढरे, डॉ. एकनाथ खेडकर, खरेदी-विक्री संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटभाऊ भुजबळ, संचालक विश्वासकाका ढमढेरे व दादा पाटील फराटे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, श्रीकांत सातपुते, ॲड. सुदीप गुंदेचा, संदीप ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, सर्जेराव खेडकर, प्रा. माणिक खेडकर, श्रीकांत पाचुंदकर, उद्योजक गणेश लांडे, अनिल दुंडे, प्रा. कृष्ण ताटे, स्वप्निल गायकवाड, बाळासाहेब व्यवहारे, सुनील वडघुले, सरपंच अंकिता भुजबळ, रावसाहेब करपे, रमेश गडदे, सोमनाथ भुजबळ, सविता करपे, संभाजी भुजबळ, पत्रकार सुनील लोणकर, पोलिसकाकाचे संपादक संतोष धायबर, शिरूर तालुका डॉट कॉमचे संपादक तेजस फडके, संजय बारहाते, विविध प्रसार माध्यमांचे पत्रकार, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी वेळेत लग्न लावण्याचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. यावेळी जर्मनीचे पाहुणे बेंजामिन हे सर्वांचेच आकर्षण ठरले.

दरम्यान, अलीकडील काळात शुभविवाह टळून गेल्यानंतर अर्धा ते एक तासाने लग्न लावले जाते. दरम्यानच्या काळामध्ये अनेक उपस्थित मान्यवरांची शुभ आशीर्वादाची भाषणे होतात. तीच तीच भाषणे ऐकून लग्नासाठी आलेले लोक त्रासून जातात, तसेच लग्नाची वेळही टळून गेलेली असते. अनेक मान्यवर वेळ काढून लग्नासाठी दूरवरून आलेले असतात. वेळेत शुभकार्य होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे काळाची गरज असून मान्यवरांचा वेळ वाया जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेत शुभविवाह लागल्याने प्रा. शिंगाडे व राजाराम लकडे यांचे सर्वच मान्यवरांनी विशेष कौतुक करून या लग्नाचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा असे मत व्यक्त केले.