शिरुर तालुक्यात एका विवाहित महिलेची त्याच्यामुळे आत्महत्या, तर दुसऱ्या महिलेला आत्मदहन करण्याची वेळ…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रामलिंग येथे तीन महिन्यांपुर्वी प्रेम प्रकरणातून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी तिने सहा पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात ढोकसांगवी गावच्या एका ग्रामपंचायत सदस्याचे नाव होते. त्याच ग्रामपंचायत सदस्याने गावातील एका ग्रामपंचायत सदस्या असलेल्या दलित महिलेला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती महिला रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यास गेल्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद दाखल करुन घेतली नसल्याच्या निषेधार्थ संबंधित महिला 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे.

शिरुर तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शिक्रापुर पोलिस स्टेशनला एका महिलेने बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्या पिडीत महिलेने 15 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याबाबत निवेदन दिलेले असताना ढोकसांगवी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रियांका जगताप या महिलेला त्याच गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि रांजणगाव MIDC तील बांधकाम व्यावसायिक असलेल्या योगेश मलगुंडे आणि काळुराम मलगुंडे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असुन एवढा गंभीर प्रकार घडूनही रांजणगाव MIDC पोलिसांनी संबंधित महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्याने ती महिला 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे.

याबाबत ढोकसांगवीच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलिस महासंचालक, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन दिले आहे. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्याशी संपर्क साधला असता प्रियांका जगताप या 15 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याबाबत मला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात