dhamari women

धामारीमधील प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना प्रमाणपत्र प्रदान!

शिरूर तालुका

शिक्रापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामारी येथे पंचायत समिती सेस अंतर्गत यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी माजी आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे कांतीलाल उमाप, जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे, यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपाली शेळके, प्रशिक्षक वंदना शेडगे, गावातील प्रशिक्षणार्थी महिला, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आनंद मोहिते, नाथाभाऊ केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांनी तयार केलेल्या वस्तू सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे अनेकांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कांतीलाल उमाप म्हणाले, ‘महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना छोटे-मोठे व्यावसाय करावेत. व्यवसायामुळे व्यवहारीपणा तर येतोच. पण, शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी नव्हे तर बचतीची सवय लागते. महिलांनी पंचायत समिती सेस अंतर्गत यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग स्वतःच्या जीवनातही करावा. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तर सुधारेल पण स्वःतालाही सिद्ध करून दाखवता येऊ शकेल. ग्रामीण भागात सुद्धा पाळणाघरांची आवश्यकता भासू लागल्यामुळे पाळणाघर सुरू करावीत. शासनाच्या योजनांच्या किमान दहा पुस्तिका गावात जायला हव्यात, यामुळे योजनांची माहिती मिळू शकेल.’

दीपाली शेळके यांनी महिलांचे कौतुक करताना म्हणाल्या, ‘ग्रामीण भागातील महिला व्यवसायाच्या माध्यमातून स्वःताच्या पायावर उभ्या राहू लागल्या आहेत. काही महिला तर उद्योजीका झाल्या आहेत. महिलांमध्ये व्यवहार चातुर्य असल्यास जगाची बाजार पेठ काबीज करता येऊ शकेल.’ व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करुन यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रयत्न करा, असे रामदास थिटे म्हणाले.

अनिता पावसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सीमा मोहिते यांनी आभार मानले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामारीचे मुख्यापक सुदाम खैरे यांचे विशेष सहकार्य लाभले.