शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा सन्मान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

महाराष्ट्र पोलिस दलात सतत 28 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक

शिरुर (तेजस फडके): शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने शिरुर पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अनेक गुन्ह्यात स्वतः लक्ष घालून गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्याचा तपासात स्वतः लक्ष घालून आरोपींना गजाआड करण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

तसेच महाराष्ट्र पोलीस खात्यात 28 वर्ष नोकरीं करत असताना सातत्याने उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही दिवसांपुर्वी त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले होते. महाराष्ट्र राज्यात पोलीस दलात उत्कृष्ट तपास आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक देण्यात येते. यावेळी राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस निरीक्षक राऊत यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले, उपाध्यक्षा शशिकला काळे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्ष किरण पिंगळे, महीला दक्षता समितीच्या सदस्या सुवर्णा सोनवणे, राणी शिंदे, जया खांडरे, डॉ वैशाली साखरे, पत्रकार शोभा परदेशी, वैशाली बांगर, रेणुका भांगरे आदी महिला मान्यवर यावेळी उपस्थित होत्या.