रमजान शांततेत व उत्साहात पार पाडा; प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर: मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान असून देव देवतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम नागरिकांनी सर्व धर्मांना एकत्रित घेऊन रमजान ईद सण शांततेत व व्यवस्थित साजरा करावा असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी शिक्रापूर व परिसरातील मुस्लिम बांधवांना केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशन च्या वतीने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर बोलत होते. याप्रसंगी शिक्रापूर जामा मस्जिदचे अध्यक्ष शिराजभाई शेख, तळेगाव ढमढेरे मस्जिदचे अध्यक्ष मुनीरभाई मोमीन, अशपाक मोमीन, आसिफ तांबोळी, शौकत इनामदार, नूर अन्सारी, रफिक तांबोळी, करीम तांबोळी, असिफ तांबोळी, बाबूलाल इनामदार, कादरभाई गोलंदाज, बद्रुद्दीन इनामदार, सबील तांबोळी, दगडू तांबोळी यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना या भागामध्ये प्रत्येक सणामध्ये सर्व धर्माचे नागरीक एकत्र येत असतात हि आनंदाची बाब असून सर्वांनी एकोप्याने सण साजरे करावे, काही अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, रमजान ईद नमाज पठनचे वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगत सर्व धर्मियांनी एकत्र येऊन सर्वधर्म समभाव जपण्याचे आवाहन करण्यात आले असून पोलिसांकडून संपूर्ण मदत व सहकार्य करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले. यावेळी पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे आभार मानले.