शिक्रापूरात विद्युत रोहित्र व जुन्या तारा बदला

शिरूर तालुका

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथील विद्युत रोहित्र बदलून जुन्या तारा देखील बदलून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत निवेदन देऊन केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण तसेच व्यापारी संकुल परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरण चालवणे कठीण झाले असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना घेराव घातला.

याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गोरक्ष सासवडे, युवा सेनेचे अध्यक्ष विजय लोखंडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, अंकुश घारे, मंगेश चव्हाण, अक्षय शेळके, गणेश पुंडे, दत्तात्रय भुजबळ, शंकर गवारे, अरविंद गरुड, संदीप इथापे, अनंता गायकवाड तुषार साळुंके यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यापूर्वी देखील विद्युत वितरण विभागाला निवेदन देण्यात आलेले असताना काहीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली, तर यावेळी बोलताना सदर ठिकाणी ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास नव्याने विद्युत रोहित्र बसवून देण्यात येईल त्यातून सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.