राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाची कवठे येमाई येथे बनावट ताडीवर धडक कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात कवठे येमाई येथे ताडी व अवैध मद्य विक्री व वाहतुक केल्याप्रकरणी राज्य उप्तादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत वाहनासह ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग या कार्यालयास (दि. ३१) जुलै रोजी एक इसम मागील दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात बनावट ताडी व अवैध मद्य विक्री व वाहतुक करत असल्याबाबत खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने (दि.३१) जुलै रोजी कवठे येमाई, ता. शिरूर येथे नारायणगाव विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्री पाळत ठेऊन होते.

याबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्याने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क संचालक, मुंबई सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, राज्य पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत, तसेच उपअधीक्षक युवराज शिंदे, उपअधीक्षक एस आर पाटील, उपअधीक्षक एस बी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पाळत ठेवून (दि 1) ऑगस्ट रोजी सकाळी छापा मारला असता कवठे येमाई गावच्या हद्दीत टाकळी हाजी रोडवर मारुती कंपनीच्या लाल रंगाचे वाहन क्र. एमएच १४ बी.आर ३३०५ मारुती कंपनीची वैगनार या चारचाकी वाहनाचा संशय आल्याने व त्यात प्लास्टीक कॅन दिसुन आल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात ३५ लिटरच्या तीन प्लास्टीक कॅन मध्ये बनावट ताडी मिळून आली.

या कारवाईत वाहनासहित 4 लाख 2 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालक निलेश काळुराम बोडरे (वय 45) रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे यास सदरचा बनावट ताठी साठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करुन आणल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदयानुसार राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव बीट क्र. 1 विभागाने गुन्हा नोंद करुन वरील मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाईत नारायणगाव विभागाचे निरीक्षक सुनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक एस एफ ठेंगड़े, दुय्यम निरीक्षक एम एस धोका, सहायक दुय्यम निबंधक दयानंद माने, सर्वश्री जवान विजय विंचुरकर, जयदास दाते, संदीप सुर्वे, यांनी सहभाग घेतला, सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीट-१ एस. एफ. ठेंगडे हे करत आहे.