त्या बँकेला तारण दिलेली जमीन परस्पर विक्री

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांत दोघा बापलेकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील ताथवडेवस्ती येथील एका शेतकऱ्याने बँकेला तारण दिलेल्या जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण निवृत्ती गुंड व निवृत्ती हरिभाऊ गुंड या बापलेकांवर गुन्हे दाखल करत प्रवीण निवृत्ती गुंड यास अटक करण्यात आली आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखेतून प्रवीण गुंड याने २०१५ साली त्यांची केंदूर येथील जमीन गट नंबर ३१९० मधील जमीन तारण ठेवून २५ लाख रुपये कर्ज घेतले होते, सदर कर्ज घेत असताना त्याचे वडील निवृत्ती यांसह आदींची जमीन देखील बँकेकडे तारण देऊन त्यांना सहकर्जदार करण्यात आले होते. मात्र २०१५ नंतर गुंड यांनी बँकेच्या कर्जाचा हप्ताच भरला नसल्याने त्यांना वारंवार नोटीस देण्यात आले.

बँकेचे घेतलेले कर्ज व त्याचे व्याज वाढून तब्बल ६५ लाख ९५ हजार रुपये रक्कम झाली परंतु बँकेचे कर्ज न फेडता प्रवीण गुंड व निवृत्ती गुंड यांनी बँकेकडे तारण दिलेल्या जमिनीचे तुकडे करत सदर जमीन आशा युवराज काकडे रा. वडगाव शिंदे ता. हवेली जि. पुणे, अमोल काळूराम शिवरकर रा. कासारी (ता. शिरुर) जि. पुणे, ज्ञानेश्वर नाथू थिटे रा. केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे, शरद नाथू दरेकर रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे सोमनाथ रतन मूरकुटे रा. आपटी (ता. शिरुर) जि. पुणे, मनीषा प्रवीण पुंडे रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे यांना बँकेच्या परस्पर विक्री करुन बँकेची तब्बल ६५ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत श्री. भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रवीण निवृत्ती गुंड व निवृत्ती हरिभाऊ गुंड दोघे रा. केंदूर ताथवडे वस्ती (ता. शिरुर) जि. पुणे या बापलेकांवर गुन्हे दाखल करत प्रवीण निवृत्ती गुंड यास अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.