शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या मूळ उद्देशाला त्यामुळे हरताळ फासला जात आहे.

शिरुर तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासुन वाळू ठेकेदार घोड धरणातून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा करत असुन सर्वसामान्य लोकांना मात्र शासनाच्या नियमानुसार एकही ब्रास वाळू मिळत नाही हिच मोठी शोकांतिका आहे. विशेष म्हणजे ‘काळ्या बाजाराने’ हिच वाळू 4 ते 5 हजाराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य लोकांना कमी दराने वाळू देणार असल्याचे केलेली घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे.

वाळू उपशाबाबतच्या नियमांची पायमल्ली …?

शिरुर तालुक्यातील घोड धरणात वाळू लिलाव झाल्यानंतर नियमानुसार वाळू उपसा होणे अपेक्षित असताना वाळू उपशाबाबत सगळ्या नियमांना ढाब्यावर बसवत वाळू ठेकेदार हा रोज वाळू उपशाबाबत नियम मोडण्याचे नवनवीन विक्रम बनवत चालला असुन शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

 

कही पे निगाहे कही पे निशाणा…

घोड धरणात वाळू ठेकेदाराने कोणत्या ठिकाणी, कोणत्या गटातून वाळू उपसा करावा. याबाबत शासनाने काही नियम व अटी घालुन दिलेल्या आहेत. परंतु हे सगळे नियम आणि अटी मोडीत काढत वाळू ठेकेदाराने स्वतःची मनमानी करत घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या शिंदोडी येथील आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या “अशुद्ध जल उदंचन केंद्राच्या” जवळच वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला आहे.

 

महसूलने लक्ष देण्याची गरज…?

शासनाच्या नियमानुसार वाळू ठेकेदाराने ज्या गटात वाळू उपसा करणे अपेक्षित आहे. त्या गटात वाळू उपसा न करता. ज्या ठिकाणी वाळू उपसा करण्याला बंदी आहे. तिकडेच सोयीनुसार वाळू उपसा करत ती वाळू जास्त भावाने ‘काळ्या बाजाराने’ विकण्याचा सपाटाच वाळू ठेकेदाराने लावला असुन शिरुरची महसूल यंत्रणा हा गैरप्रकार रोखणार का अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.