कोरेगाव भीमातील ऐतिहासिक विजयस्तंभ समोरील दिवेच बंद

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे अनेक दिवसांपासून शासकीय पातळीवर विकास तसेच सुशोभीकरण करण्यात येत असताना येथील विजयस्तंभ समोर रस्त्यावरील दुभाजकावर विद्युत दिवे बसवण्यात आले. मात्र सध्या सर्व दिवे बंद पडलेले असल्यामुळे रस्ता अंधारमय होत आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे काही वर्षापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर शासनाकडून विजयस्तंभ परिसर ताब्यात घेत शासकीय पातळीवर विकास करण्यास सुरुवात करण्यात आलेली असताना 2 वर्षापूर्वी विजयस्तंभा समोर पुणे नगर महामार्गावर उजेड राहण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकावर अनेक पथदिवे बसवण्यात आले. मात्र सध्या सर्वच दिवे बंद पडलेले असल्याचे दिसत आहे.

सर्व दिवे बंद असल्याने येथे रस्त्याच्या कडेला मोठा अंधार असल्याचे दिसून येत आहे. सध्या शौर्य दिन जवळ आलेला असल्याने येथील सर्व दुरुस्ती करणे गरजेचे असताना दिव्यांची देखील दुरुस्ती करण्याची मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर या दिव्यांचा विचार करत योग्य खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतने दिवे सुरु करावे; सर्जेराव वाघमारे

विजयस्तंभ समोर सार्वजनिक बांधकाम विभागाने पथदिवे बसवून सदर दिवे ग्रामपंचायत कडे वर्ग केलेले आहेत. त्यामुळे सदर दिव्यांची देखभाल, दुरुस्ती व इतर खर्चाची जबाबदारी ग्रामपंचायतची असून ग्रामपंचायतने सर्व दिवे दुरुस्ती करत सुरु करावे, असे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

बार्टीकडे खर्चाबाबत पत्रव्यवहार केला; कानिफनाथ थोरात

विजयस्तंभ समोरील रस्त्याच्या दुभाजकावर असलेले सर्व दिवे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतचे उत्पन्न कमी असल्याने ग्रामपंचायत त्या दिव्यांचे बिल भरु शकत नसल्याने बार्टीच्या वतीने त्याची देखभाल व इतर खर्च करावा, असा पत्रव्यवहार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आल्याचे पेरणे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कानिफनाथ थोरात यांनी सांगितले.