हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून घाटे अळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात असे आवाहन पुण्याचे कृषि सह संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली असून ही कीड बहुभक्षी असून पिक फुलोरा आणि घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. शेतकऱ्यांनी शेताची कोळपणी करुन पिक तणविरहित ठेवून घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५, एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील कृषि सह संचालक डॉ. तुकाराम मोटे याच्या वतीने करण्यात आले आहे.