कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

महाराष्ट्र शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली.

मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून व परतीचा पाऊस अल्प प्रमाणात पडला होता. यामुळे जमिनीतील पाणीपातळीत थोडीफार वाढ झाली होती. मात्र, काही दिवसांपासून दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असून, नैसर्गिक जलस्रोत आटले आहे. जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट होऊन गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शासनाने या भागात त्वरित टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जलजीवन मिशनची कामे अपूर्ण

मागील दोन वर्षांपासून केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी या योजना पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट आहेत. भविष्यातील भीषण पाणीटंचाईकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे रखडलेल्या अर्धवट कामावरून निदर्शनास येत आहे.