न्हावरे (अक्षय टेमगिरे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील टाकळी भिमा-म्हाळुंगी डॅम परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडगाव बांडे सर्कल ऑफिसच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सारा सावळागोंधळ सुरु असूनही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्राची होत असलेली लूट आता उघडपणे सुरु असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
View this post on Instagram
रात्रीस वाळू माफियांचा खेळ चाले…
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज मध्यरात्रीनंतर अवैध वाळू उपशाला सुरुवात होते. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात उपसली जाते आणि हायवा वाहनांमध्ये भरुन ती पुढे टाकळी भिमा हद्दीतील वनक्षेत्रालगत एका ठिकाणी साठवली जाते.
टेहळणीसाठी संशयास्पद गाडी…?
या अवैध वाळूउपशा दरम्यान काळ्या रंगाची एक चारचाकी गाडी सतत परिसरात उभी असते. येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणे, हालचालींची माहिती देणे अशी भुमिका या गाडीतील व्यक्ती पार पाडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हि गाडी वनक्षेत्राजवळ उभी राहत असल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद ठरत आहे.
प्रशासनाचे मौन की संगनमत…?
यापुर्वीही अनेकवेळा या परिसरात वाळू उपशाचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी कारवाईचा फक्त दिखावा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यातच आता वडगाव बांडे येथील संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा रंगत आहे. तसेच संबंधित अधिकारी वाळू माफियांच्या वाहनांमध्ये फिरत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कुंपणच खातंय शेत …?
या संपुर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या भुमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “कुंपणच शेत खातंय का…?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारेच जर माफियांना पाठीशी घालत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची…? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही…
या संदर्भात दौंड तालुक्यातील वडगाव बांडे सर्कलचे अधिकारी रवींद्र सरोदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार त्यांना संपर्क साधला असता त्यांनी मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.
पर्यावरण धोक्यात; तातडीच्या कारवाईची मागणी…
या अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीपात्राची झपाट्याने धूप होत आहे. भूजल पातळी घटण्याचा धोका वाढला असून, परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. तसेच टाकळी भिमा-म्हाळुंगी डॅम परिसरातील नैसर्गिक संपत्तीचा होणारा विनाश थांबवण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा आता तरी जागी होणार का…? वाळू माफियांचा हा ‘रात्रीचा खेळ’ कधी थांबणार…? संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, संबंधित अधिकारी आणि वाळू माफियांवर कडक कारवाई होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.
View this post on Instagram
घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…?
शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…
घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?
शिरुर तालुक्यात वाळू उपशावरुन दोन गट आमनेसामने; फायटर व दगडांनी हल्ला…
Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ