रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू; दोन महिन्यांनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC परिसरातील कारेगाव हद्दीतील एका कंपनीत उंचावर काम करताना एका कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत कामगाराच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तब्बल दोन महिन्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी मोहन सुरेश ढमढेरे (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर, जि.पुणे) या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, हि घटना २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:२० वाजता कारेगाव येथील रांजणगाव MIDC मधील ट्रायमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनी येथे घडली होती. मृत कामगाराचे नाव अमोल विष्णू ढालस्कर (वय ३०) रा. सिसम बुद्रुक, शिवाजीनगर, ता. जि. हिंगोली असे आहे. या प्रकरणी त्यांचे वडील विष्णू बालाजी ढालस्कर (वय ५८) वर्षे यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीतील माहितीनुसार, कंत्राटदार मोहन ढमढेरे यांनी अमोल हालस्कर व इतर कामगारांना कंपनीमध्ये कामावर घेतले होते. कंपनीच्या छतावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम कामगारांकडून करुन घेतले जात होते. मात्र, उंचावर काम करण्याचा कोणताही अनुभव नसताना, आवश्यक प्रशिक्षण न देता आणि सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरविता काम करायला लावल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. 

हे काम सुरु असताना अमोल हालस्कर यांचा पाय घसरला आणि ते उंचावरुन कंपनीच्या आतील भागात खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विजय सरजिने हे करत आहेत.

कामगार मेल्यावरच प्रशासन जागे होणार का…?

या घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे उंचावर काम करणाऱ्या कामगाराला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी नेट, हार्नेस, प्रशिक्षण, पर्यवेक्षण यापैकी कोणती साधने व व्यवस्था उपलब्ध होती का…? हा मोठा प्रश्न आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगारांकडून धोकादायक कामे करुन घेताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात कामगारांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रांजणगाव MIDC परिसरात हजारो कामगार रोज विविध कंपन्यांमध्ये जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र, अपघात झाल्यानंतर काही दिवस चर्चा होते, गुन्हा दाखल होतो आणि नंतर प्रकरण थंडावते. अशा निष्काळजी व्यवस्थेमुळेच कामगारांच्या मृत्यूच्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. प्रशासनाने आता केवळ कागदी कारवाई न करता अशा कंपन्या व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

औद्योगिक वसाहतीत सुरु आहे सावळा गोंधळ…? 

रांजणगाव MIDC तील कंपन्या, कंत्राटदार, सुरक्षा अधिकारी, कामगार विभाग, कारखाना निरीक्षक आणि स्थानिक प्रशासन यांच्या जबाबदाऱ्या कागदावरच राहिल्या आहेत का.. ? उंचावर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा तपासली जाते का…? कंत्राटी कामगारांना प्रशिक्षण दिले जाते का…? की स्वस्त मजुरीच्या नावाखाली गरिब कामगारांचा जीव धोक्यात घालण्याची पद्धत सुरु आहे…? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने आता जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे.

गुन्हा दाखल झाला पण पुढे काय…?

या घटनेत कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी केवळ कंत्राटदारावर कारवाई करुन प्रकरण मिटवणे योग्य ठरणार नाही. कंपनी व्यवस्थापनाची भूमिका काय होती, काम सुरु करण्यापुर्वी सुरक्षा परवानगी घेण्यात आली होती का…? साइटवर सुरक्षा अधिकारी उपस्थित होता का…? कामगारांना सुरक्षिततेसाठी योग्य साधने देण्यात आली होते का…? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

कामगार सुरक्षा तपासणी मोहीम राबवा; नानासाहेब लांडे 

हिंगोलीहून पोटासाठी पुणे जिल्ह्यात आलेल्या अमोल हालस्कर यांचा कंपनीतील कामादरम्यान मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, अशा प्रत्येक घटनेनंतर एकच प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे कामगारांच्या जीवाची किंमत प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनासाठी नेमकी किती आहे…? या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मृताच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि रांजणगाव MIDC मधील सर्व कंपन्यांमध्ये कामगार सुरक्षा तपासणी मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी केली आहे. 

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…? 

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत