बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण गोळा करण्यासाठी गेले असताना त्यांना मानवी अवशेष दिसून आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल व दुर्गम असल्याने मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला.
तपासात एका मृताची ओळख निलेश नारायण घोंगरे (वय 26, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) अशी पटली आहे. निलेश सुमारे महिनाभरापूर्वी मायंबा गडावर दर्शनासाठी आला होता, मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी अंभोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याचे निष्पन्न होताच घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश झाला.
दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय 65, रा. भिलवाडा, ता. पाथर्डी) यांचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, गडावर फिरताना रस्ता चुकल्याने किंवा पाय घसरून ते दरीत पडले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून सर्व शक्य त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.