शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांबे वस्ती, न्हावरे येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संकेत बाजीराव साठे (वय 30, व्यवसाय – शेती, रा. तांबे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत, त्यांच्या घराचे पुढील दरवाजाला कुलूप लावलेले असताना, आरोपी अर्जुन बबन राठोड (रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलढाणा) व करण विनोद चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी पाठीमागील खिडकीवरून घरात प्रवेश करून चोरी केली.
या चोरट्यांनी घरातील छतावरून आत प्रवेश करत 1,50,000 रुपयांची रोख रक्कम (500 रुपयांच्या 300 नोटा), 1,20,000 रुपये किंमतीची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याची गणपती मूर्ती, तसेच 10,000 रुपये किंमतीचा मुलांचा पैसे साठवण्याचा डब्बा, आणि आई साधना बाजीराव साठे यांच्या नावाची एफ.डी.ची कागदपत्रे असा एकूण 2,80,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक फौजदार रमेश कदम यांनी गुन्हा नोंदवला असून, पोलिस हवालदार दिपक पवार हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.