करंदीत पाटबंधारेच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्यामध्ये पाटबंधारे प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचा कर्मचारी बाळू नामदेव गुंडाळ या कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याला पाणी आलेले असल्याने सदर कालव्याच्या गेटवर नियंत्रण करणारे काही कर्मचारी बाळू गुंडाळ सह आदी कर्मचारी काम करत असताना सकाळच्या सुमारास बाळू गुंडाळ हे कर्मचारी बराच वेळ अन्य कर्मचाऱ्यांना दिसले नाही. त्यामुळे तेथील अन्य कर्मचाऱ्यांनी गुंडाळ यांना आवाज दिला. तसेच आजूबाजूला पाहणी केली असता काही वेळाने बाळू गुंडाळ हे पाण्यात बुडून मयत झाल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार श्रावण गुपचे, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, चिमाजी साबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदन साठी पाठवून दिला. या घटनेत बाळू नामदेव गुंडाळ (वय ४५) रा. पडाळवाडी राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांचा मृत्यू झाला.

याबाबत राहुल नारायण थिगळे (वय ३4) रा. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.