रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर देशी दारु वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन तरुणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता राजमुद्रा चौक, हॉटेल कृष्णराज परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी एमएच १६ ए एन ७५०५ क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरुन दोन जण बेकायदेशीर दारुची वाहतूक करत असल्याचा संशय आला. त्यावेळी पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता मोटारसायकलवर ठेवलेल्या पांढऱ्या गोणीतून ‘टॅंगो पंच’ देशी दारुच्या ९० मिली मापाच्या तब्बल ३०० बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणी सलमान बशीर खान (वय १९) आणि अमिन सदार खान(दोघेही रा. राजमुद्रा चौक, हॉटेल कृष्णराज परिसर, रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १२ हजारांची देशी दारु आणि ३० हजार रुपयांची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे.या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार मुंडे पुढील तपास करत आहेत.