कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

कान्हूर मेसाई गावात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई निर्माण झाली असून, विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलचे पाणी आटणे, तसेच उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा ठरणे, या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला असून,या बैठकीत पाणीपुरवठ्याचे कायमस्वरुपी नियोजन, सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देणे, जलस्रोतांचे बळकटीकरण, तसेच तातडीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

कान्हूर मेसाई येथील शेतकरी या बैठकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, केवळ आश्वासनांपुरते न राहता ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची मागणी केली जाणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात वाढणारी पाणीटंचाई लक्षात घेता तातडीने उपाययोजना जाहीर व्हाव्यात, अशी शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीस उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दर्शवली असून, समस्या समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्याची बैठक केवळ चर्चेपुरती न राहता कान्हूर मेसाईच्या पाणीप्रश्नावर निर्णायक ठरणार का…? याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आमदार राहुल कुल , जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून शेखर पाटील पाचुंदकर यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा सतीश पाचंगे याही यावेळी उपस्थित राहणार आहेत.