शिक्रापूरात ऑडीच्या धडकेत टेम्पो उलटून चालक गंभीर जखमी…

क्राईम शिरूर तालुका

कार व जखमीला सोडून सिमेंट कंपनीचा मालक गौरव जैन गायब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रोडलगत एल अँड टी फाटा येथे ऑडीकार च्या धडकेत टेम्पो रस्त्यावर पलटी होऊन टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली, तर यावेळी श्री सिमेंट कंपनीचे मालक असलेले गौरव जैन स्वतःची कार व चालकासह जखमी टेम्पो चालकाला जागेवर सोडून दुसऱ्या वाहनातून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशिष मुत्था हे १२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एस एफ ६६५८ हा टाटा एस टेम्पो घेऊन पुणे नगर रोडने चाललेले असताना एल अँड टी येथे रस्ता ओलांडण्यासाठी उभे राहिलेले असताना नगर बाजूने पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एम एच ०१ बी के ५६७९ या ऑडी कारची टेम्पोला जोरदार धडक बसून टाटा एस टेम्पो रस्त्यावर उलटला दरम्यान टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.

मात्र यावेळी भयानक अपघात होऊनही ऑडी कार मध्ये असलेले श्री सिमेंट कंपनीचे मालक गौरव जैन यांनी तातडीने दुसरी कार बोलावून घेत जखमी व्यक्तीसह स्वतःची ऑडी कार व कर वरील चालकाला तेथे सोडून निघून गेले. दरम्यान येथील नागरिकांनी टेम्पो उभा करत टेम्पो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. तर घटनेची माहिती मिळताच अपघात मदत पथकातील पोलीस नाईक राकेश मळेकर यांनी सदर टेम्पो रस्त्यातून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

सदर घटनेत टेम्पो चालक आशिष विजकुमार मुत्था (वय ६५) रा. गार्डन सिटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि.पुणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून याबाबत विजयकुमार चांदमन मुत्था (वय ६५) रा. गार्डन सिटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि.पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऑडी कार चालक प्रल्हादराय हनुमनाराम मिना (वय ६0) रा. मोहिनी महेल ४ नौरोजी गमडिया रोड मुंबई याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

श्री सिमेंटच्या गौरव जैनचे कृत्य खेदजनक…

रस्त्याने एखादा अपघात झाल्यास अनेकदा जखमीला उपचारासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात असताना श्री सिमेंट सारख्या मोठ्या कंपनीचे मालक स्वतःच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर जखमी सह कार व चालकाला सोडून अन्य वाहनात निघून जात असल्याची बाब खेदजनक असल्याचे बोलले जात आहे.