शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा उच्छाद, खुणाच्या, चोरीच्या घटना उघडकीस येईना…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत खुणासह, बलात्कार, सोनसाखळी चोऱ्या, मंदीरातील चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील अनेक गुन्हे अदयापपर्यंत उघडकीस आले नसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आरोपी अदयापपर्यंत फरार आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे (दि. ८) जानेवारी रोजी एका अज्ञात महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते. हा खुण कुणी व कशासाठी केला? याचा शोध अद्याप लागला नाही. तसेच अदयापपर्यंत या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तोच पुन्हा निमोणे येथे पंधरा दिवसांपुर्वी निमोणे – मोटेवाडी रोडलगत अज्ञात इसमाने चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून मनोहर शितोळे यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृणपणे खुन केला आहे. तसेच खुण झालेल्या नातेवाईकांच्या येथे एका शेतमजूर कामगाराने आत्महत्या केली आहे. हा शेतमजुर कुठला व त्याने का आत्महत्या केली? त्याचा शोध अद्याप लागला नाही.

तसेच शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळ्यात) मध्ये श्री तुकाई देवी मंदिरात (दि. २) जानेवारीला रात्री धाडसी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी तिजोरी,कपाट,देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

अदयाप त्याचीही उकल होऊ शकली नाही. याच बरोबर सोनसाखळी चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोऱ्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून खुणासह या चोऱ्या उघडकीस आणणे शिरूर पोलिसांपुढे आव्हान बनले आहे. तसेच शहरासह बेट भागातील महाविदयालये, कॉलेज भरण्याच्या, सुटण्याच्या वेळेस रोडरोमिओंनी मुलींना त्रास देत धुमाकळ घातला असून त्यांना आवरणे गरजेचे आहे.

(क्रमशः)