भररस्त्यात कॉस्टेबल आणि होमगार्ड मध्ये सिनेस्टाईलने हाणामारी

क्राईम

उत्तर प्रदेश: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. कारण, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत होमगार्ड हा पोलीस कॉंस्टेबलला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे.

उत्तर प्रदेश मधील जालौन शहरात ही घटना घडली आहे. येथील रामपुरा ठाणे हद्दीतील जगम्मनपूर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हाणामारीचा व्हिडीओ समोर येताच जालौनचे पोलीस अधीक्षक रवी कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेला हा व्हिडीओ 28 ऑगस्टचा असल्याचं सांगितलं जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कॉंस्टेबलची होमगार्डसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीच रुपांतर हाणामारीत झालं. जगम्मनपूर परिसरात पोलीस व्हॅन थांबवून दोघांनीही एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नेमकी ही हाणामारी कोणत्या कारणाने झाली, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे पोलीस कॉंस्टेबल आणि होमगार्ड एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहे. त्यांच्यासोबत असलेला एक पोलीस कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्याला बाजूला सावरून दोघेही एकमेकांना मारहाण करत आहे.

दरम्यान, एकाने या सर्व प्रकारचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल होताच, जालौनचे पोलीस अधीक्षक रवी कुमार यांनी या पोलीस कॉंस्टेबलसह होमगार्डचं निलंबन केलंय. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.