निमगाव म्हाळुंगीत जुन्या वादातून युवकाला मारहाण…

क्राईम

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नामदेव कांतीलाल भोरडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील अक्षय भोरडे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर शेतातील झाडेझुडपे तोडण्याच्या कारणावरून जून २०२१ मध्ये अक्षय भोरडे व नामदेव भोरडे यांच्या दोन्ही कुंटुंबियात वाद झाला होता. त्यावेळी नामदेव भोरडे व त्यांच्या कुटुंबीयांनी अक्षयच्या वडिलांना व बहिणीला गंभीर मारहाण केली होती. त्याबाबत गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलिस करत असताना तपासात अक्षय याने काही पुरावे जोडले होते.

नामदेव यांनी त्याबाबतचा राग मनात धरून अक्षय हा सकाळच्या सुमारास निमगाव फाटा येथील डेअरी मध्ये दूध घालण्यासाठी गेला असताना जुन्या केस मध्ये ‘तू किती पुरावे देशील, आता तुला जीवे ठार मारून टाकतो’ अशी धमकी देत मारहाण करत गंभीर जखमी केले.

याबाबत अक्षय हरिभाऊ भोरडे (रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी नामदेव कांतीलाल भोरडे (रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.