पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

क्राईम

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 5 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील कमळाई वस्ती वर राहणारे निलेश धुमाळ व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात चोरटे दरवाजा तोडून घरात आले त्यांनतर निलेश व त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले काढून घेतले. त्यानंतर घरातील कपाट उघडून पाहणी केली तसेच यावेळी दोघांनी शेजारील घरात जाऊन येथील दागिने देखील काढून घेत निलेश जवळील दोन्ही मोबाईल देखील घेतले.

काही वेळाने सर्व चोरटे बाहेर गेल्याने निलेश यांनी आरडाओरडा केला. मात्र शेजारी दुसऱ्या खोलीत झोपलेला निलेशचा भाऊ झैलसिंग हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या घराच्या देखील कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने झैलसिंग हा घराची कौले खोलून बाहेर आला. यावेळी सर्वांनी घराच्या बाहेर पाहणी केली असता निलेशचे दोन्ही मोबाईल बाहेर फुटलेल्या अवस्थेत मिळून आले.

या घटनेत चोरट्यांनी 4 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह काही चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला असून याबाबत निलेश बाळासाहेब धुमाळ (वय ३६) रा. कमळाईवस्ती पिंपळे खालसा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 5 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

बुरुंजवाडी व पिंपळे खालसातील आरोपी एकच असल्याची शक्यता…

शिक्रापूर नजीकच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुरुंजवाडी येथे तीन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत चोरी केल्याचा प्रकार घडलेला असून आता शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेत अनेक साम्य असल्याने दोन्ही ठिकाणी एकाच चोरट्यांच्या टोळक्याने चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.