Crime

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख सह ११ जणांवर गुन्हा दाखल

क्राईम

पाचोरा: निपाणे येथे दलित समाजातील वृध्द महिलेच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करणार्‍या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील यांच्यासह ११ जणांवर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती कायद्याअंतर्गत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेने संपुर्ण तालुक्यासह जिल्हा हादरला असुन अजुनही मागासलेल्या विचार सरणीवर जगणार्‍या लोकप्रतिनीधींच्या या कृत्याची समाजमनात चिड निर्माण होत आहे. पाचोरा पोलिसांनी कोणत्याही दबावात न येता गुन्ह्याचा तपास व चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी पिडित कुटुंबातील सदस्य व तालुक्यातील सर्व दलित संघटना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भेट घेणार आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, समाधान वामन धनुर्धर हे निपाणे येथील रहीवाशी असुन त्यांची आई निलाबाई वामन धनुर्धर (वय ६७) या सुरत येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्यांचे (दि. ११) सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता सुरत येथेच वृध्दपकाळाने निधन झाले. सर्व नातेवाईक इकडेच असल्याने आईचा अंत्यसंस्कार निपाणे येथे करण्यासाठी आईचे प्रेत (दि. १२) सप्टेंबर रोजी निपाणे येथे आणण्यात आले.

अंत्यविधीचा वेळ रात्री १०:३० वाजेचा ठेवलेली असतांना तेव्हा गावासह परिसरात पावसाने जोर धरला होता. अशा पावसात गावातील जिल्हा परिषदेने बांधुन दिलेल्या नविन स्मशानभुमित सदरचा अंत्यंसंस्कार करण्याचे सर्वांनुमते ठरल्याने तेथे रात्री अंत्यविधीसाठी गेल्यावर लाकडे रचत असतांना माजी जिल्हापरिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील, रोशन धनराज पाटील, राजेंद्र विश्राम पाटील, ञ्यंबक हिलाल पाटील, मयुर राजेंद्र पाटील, निलेश नथ्थु पाटील, शांताराम राजधर पाटील, गोकुळ सुरेश पाटील, अजबराव ज्ञानेश्वर पाटील, वैभव राजेंद्र पाटील व भैय्या बाळु पाटील यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला.

रोशन पाटील यांनी ही स्मशानभुमी महारांची नसुन मराठ्यांची आहे. तर मनोहर पाटील यांनी मला व माझे समाजाला ही स्मशानभुमी जिल्हा परिषदेने मराठा समाजासाठी बांधलेली आहे. तुम्ही महार समाजाने नेहमी प्रमाणे गावकुशाबाहेर असलेल्या मोकळ्या जागात तुमच्या आईला जाळा. इकडे आम्ही प्रेत जाळु देणार नाही. विनाकारण वाद घालुन मार खायचे काम करु नका, असे बोलले.

मनोहर पाटील यांचे सोबत आलेले राजेंद्र पाटील, ञ्यंबक पाटील, रोशन पाटील, मयुर पाटील, गोकुळ पाटील, निलेश पाटील, शांताराम पाटील यांनी येउन सांगितले की, आमच्या मराठा समाजाच्या स्मशानभुमितुन प्रेत उचलून घेउन जा नाहीतर तुमचेही या मुर्द्यासोबत मुर्दे पाडु अशी धमकी दिली. सकाळी ही स्मशानभुमी गोमुञाने धुवुन काढा हे सर्व मस्ती आले आहेत. यावेळी समाधान धनुर्धर यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीएक ऐकले नाही व धक्काबुक्की केली. वाद विकोपाला जावु नये म्हणुन समाधान धनुर्धर यांनी व दलित बांधवांनी स्मशानभुमीच्या बाहेर मोकळ्या जागेत लाकडे, टायर, पेट्रोल व डिझेल च्या सहाय्याने राञी १२:३० ला अंत्यसंस्काराचा विधी केला. आईचा धार्मिक विधी पार पाडल्यानंतर समाधान धनुर्धर यांनी (दि. १४) सप्टेंबर रोजी पाचोरा पोलिसात त्यांच्या नातेवाईकांसह येवुन मनोहर पाटील व त्यांच्या सोबतच्या १० जणांवर गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे हे करीत आहेत.

पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील दलित समाजाबाबत घडलेली ही घटना अत्यंत विदारक असुन या घटनेतील जिल्हापरिषद सदस्य मनोहर पाटील हे याच गटातुन गेल्या २० वर्षांपासुन राजकारण करित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, पत्नी जिल्हा परिषद सदस्य व स्वतः सुध्दा जिल्हापरिषद सदस्य पद उपभोगलेले व सध्या शिवसेना (शिंदे गटाचे) जळगाव जिल्हा प्रमुख म्हणुन कार्यरत असलेले लोकप्रतिनीधीनी असे समाज विघटक कृत्य केल्याने परिसरासह जिल्ह्यातील दलित समाजात संतप्त भावना असुन पोलिसांनी घटनेचे गार्भिर्य लक्षात घेवुन वेळेत पाऊले उचलले नाही तर दलित समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

आज अजित पवारांना पिडित कुटुंब व दलित बांधव भेटणार

 

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे आज पाचोरा येथे नियोजित दौर्‍यावर येणार असल्याने या प्रकरणी स्थानिक राजकिय दबाव येऊ नये व दलित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भेट घेणार असल्याने विरोधीपक्षनेते अजित पवार काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागुन आहे.