पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

महाराष्ट्र

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जाता येते. चाकण आणि शिरुर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

शिरुर ते कर्जत असा सुमारे 135 किलोमीटर लांबीचा मार्ग करण्यात येणार आहे. मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, हा मार्ग चार पदरी असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.