शिरुरच्या बेट भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांची मोठी कारवाई

क्राईम मुख्य बातम्या

सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त

शिरुर (तेजस फडके): गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात अवैध धंदे चालु असल्याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने सातत्याने आवाज उठवत याबाबत निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर शिरुर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील कवठे येमाई गावातील मुंजाळवाडी येथील गावठी दारुच्या भट्टीवर कारवाई करत सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल दिपक अरुण पवार यांनी फिर्याद दाखल केल्याने बाळु रुपाजी मुंजाळ, रा. मुंजाळवाडी, कवठे येमाई, (ता. शिरूर) जि पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि 31) रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास कवठे येमाई (ता. शिरुर) गावच्या हद्दीत गांजेवाडी शिवारात घोडनदी पात्रालगत बाभळीच्या काटेरी झुडपात 200 लिटर मापाच्या 12 बॅरलमध्ये एकूण 2400 लिटर कच्चे रसायन त्यामध्ये नवसागर, झाडाची साल, गुळ, मिरच्या, टाकुन भिजत घातलेला सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा माल मिळून आला. यावेळी पोलीसांची चाहूल लागताच बाळु रूपाजी मुंजाळ हा तिथुन पळून गेला असुन शिरुर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक धनंजय थेऊरकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.