आपटीतील दारुभट्टी शिक्रापूर पोलिसांकडून उध्वस्त

क्राईम शिरूर तालुका

कच्च्या रसायनांसह एक लाख तीस हजारांचा ऐवज नष्ट

शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दारु भट्टी पूर्णपणे उध्वस्त करत तब्बल 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल नष्ट करत दारु भट्टी चालवणाऱ्या जैसपाल नानावत या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे.

आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला 1 व्यक्ती दारु भट्टी चालवून गावठी दारु तयार करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शंकर साळुंके, उद्धव भालेराव यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता भीमा नदीच्या कडेला दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 12 हजार लिटर कच्चे रसायन तयार करुन ठेवलेले तसेच दोन ड्रम वेगवेगळे रसायन तयार करण्यास टाकल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांच्या पथकाने सर्व रसायन व दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जागीच नष्ट करुन टाकले. दरम्यान दारु निर्मिती करणारा व्यक्ती पोलिसांना मिळून आला नाही. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार श्रीमंत सर्जेराव होनमाने रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी जैसपाल नानावत रा. चिखली ता. हवेली जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.