रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी येथे एका दिव्यांग मुलीचा श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीच्या शरीराचे लचके तोडल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित हल्ला नेमका बिबट्याचा आहे की भटक्या कुत्र्यांचा, याबाबत पोलिस आणि वनविभाग तपास करत आहेत. मेघना ईश्वर काळे (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.
सोनेसांगवी परिसरात मोलमजुरी करणारे सोमनाथ काळे आणि त्यांचे कुटुंब झोपडीत राहतात. मृत मेघना ईश्वर काळे ही मुलगी दिव्यांग असल्याने हालचालींसाठी इतरांवर अवलंबून होती. ती मुख्य झोपडीच्या मागील बाजूस असलेल्या एका छोट्या पालात एकटीच झोपली होती. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास जेव्हा तिचे कुटुंबीय उठले, तेव्हा त्यांना झोपडीची पडझड झाल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता मेघना रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. हिंस्र प्राण्याने मेघनाच्या शरिराचे लचके तोडले होते. ती दिव्यांग असल्याने तिला प्राण्याचा प्रतिकार करता आला नसावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अविनाश विसलकर यांनी मृतदेहावरील जखमांजवळील स्वॅब गोळा केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे शिरूर परिसरात वन्यप्राण्यांच्या आणि भटक्या कुत्र्यांच्या वावराबाबत ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस पुढील तपास करत आहेत.
मोटेवाडी येथे विद्युत शॉक बसल्याने तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू
बेट भागात जागरण गोंधळाच्या नावाखाली उडणार राजकीय धांदल?
रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक