शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील ज्ञानेश्वर बाजीराव घाडगे (वय ४०) हे १० मे २०२६ रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ११ मे रोजी दुपारी परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घराच्या बाहेरुन लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे उघड झाले. तसेच चोरट्यांनी घरातील मौल्यवान दागिन्यांवरच डल्ला मारत तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७ तोळे ५ ग्रॅम वजनाचे साखळी गंठन, १ लाख ८० हजार रुपये किमतीची ३ तोळे वजनाची मोहन माळ, ७२ हजार रुपये किमतीचे मिनी गंठन, ७२ हजार रुपये किमतीचे डोरले तसेच गणपती-लक्ष्मी मूर्ती व निरंजनाचा समावेश आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे चोरट्यांनी घराची रेकी करुनच हि चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे दर्यापट व इनामगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून “गावात चोरट्यांचा मुक्त संचार सुरू आहे का…?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत करीत आहेत.
दरम्यान, शिरुर तालुक्यात वाढत्या घरफोड्या, चोरी आणि गुन्हेगारी घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…
Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन
शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…
शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका
शिरुर तालुक्यात भरधाव कंटेनरने पिकअपला चिरडलं; दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू, १४ जखमी