Shikrapur Police Station

हनीट्रॅप! शिक्रापूरच्या बंटी बबलीने उद्योजकाकडून उकळली खंडणी…

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेने इंस्टाग्राममधून ओळख झालेल्या एका उद्योजकाला घरी बोलावले. त्यांनतर महिलेच्या पतीने सदर उद्योजकाचा व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत काही खंडणी उकळली. मात्र, त्यांनतर देखील वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याने उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे या बंटी बबलीवर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथे राहणाऱ्या पूनम वाबळे या महिलेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून कुरकुंभ येथील उद्योजक राहुल झगडे यांच्याशी ओळख झाली. दोघे मैत्रीच्या भावनेतून बोलू लागले असताना पूनम हिने राहुलला घरी बोलावले. दोघे घरी बोलत असताना पूनमचे पती परशुराम यांनी दोघांचा बोलताना व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला. त्यांनतर परशुराम याने ‘मला एक कोटी रुपये दे, नाहीतर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. त्यावेळी राहुल याने पंचवीस हजार रुपये फोन पे द्वारे परशुराम यांना पाठवले.

परशुराम हा वारंवार फोन करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्यांनतर २३ मे रोजी पूनम वाबळे हिने राहुल यास फोन करुन तू शिक्रापूर मध्ये ये आपण हा विषय संपवून टाकू असे म्हणून राहुलला बोलावून घेतले. त्यांनतर तिने राहुलला मी व्हिडिओचा विषय संपवून टाकते तू मला पाच लाख रुपये अन्यथा एक फ्लॅट दे असे म्हणून खंडणी मागितली. घडलेल्या प्रकाराबाबत राहुल संभाजी झगडे (वय २६ वर्षे रा. झगडेवाडी कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे (दोघे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) या बंटी बबलीवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.