shirur police

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

क्राईम

आरोपींकडून तब्बल १२ कृषी पंप व केबल केली जप्त
सविंदणे (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिरूर तालुक्यातील आण्णापुर व टाकळी हाजी बेट भागामध्ये वारंवार कृषी पंप व केबल चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप व केबल हे आवश्यक गोष्ट असल्याने त्याच वस्तूंची चोरी होत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होते. व त्याबाबत समाज माध्यमांमधून पोलिसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पोलिस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरुर पोलिस ठाण्यातील पोलिसांचे वेगवेगळे पथके तयार करून सतत त्या गुन्हयाचे तपासामध्ये सातत्य ठेवून गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांनी माहिती काढून कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी तसेच चोरीची केबल व कृषी पंप घेणारा असे जेरबंद केलेली आहे.

आरोपींंची नावे पुढीलप्रमाणेः
१. वैभव सुरेश पाराटे (वय २३ वर्षे)
२. गौरव रामचंद्र पाराटे (वय १९ वर्षे)
३. सुरेश मारुती पाराटे (वय ६० वर्षे, सर्व रा. टेमकरवस्ती टाकळीहाजी ता. शिरूर जि. पुणे)
४. रज्जाक दाउद शेख (वय ५९ वर्षे, रा. हल्दी मोहल्ला शिरूर भंगार व्यवसायीक) यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून चालू स्थितीतील १२ कृषी पंप व केबल असा एकूण १,३८, १०० /- रु. चा माल हस्तगत करून एकूण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. इतर ही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अधिक तपास शिरूर पोलिस करत आहेत. सदरचे गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असलेले चोरीला गेलेले कृषी पंप व केबल त्यांना परत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहे. त्यामुळे शिरूर व बेट भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शेतक-यांना त्यांच्या नदीकिनारी असणा-या कृषी पंपाचे संरक्षण करण्यासाठी गट तयार करून त्या ठिकाणी रात्रीचे वेळी आळीपाळीने गस्त करावी, त्यांना पोलिस मदत देण्यात येईल असे आवाहन केले आहे. वरील कार्यवाही पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक मितेश गटटे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरूर यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलिस ठाणे, पोसई सुनिल उगले, पोसई एकनाथ पाटील, सहा. फौजदार माणिक मांडगे, पोना धनजंय थेउरकर, विनोद मोरे, पो.कॉ. रघुनाथ हाळनोर, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णू दहीफळे यांच्या टिमने केली आहे.