रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत पन्नास लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांना वाल्मिक चिमाजी फंड (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देत चक्क पन्नास लाखांची खंडणी मागितल्याने रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती येथे आशिष ओस्तवाल यांच्या चारचाकी गाडीची वाल्मिक फंड याने दगड मारुन काच फोडली होती. त्यामुळे आशिषचे वडिल सुनील ओस्तवाल आणि शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे हे वाल्मिक फंड याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यांनतर फंड याने विश्वास कोहकडे यांना फोन करुन तू सुनीलची बाजू घेऊन माझ्या घरी का आला होता. तुला त्याच्या बरोबर राहायचे असेल तर तर मला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर मी सुनीलच्या सोबत जो राहील त्याचा आणि सुनीलचा मर्डर करेल असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत चक्क पन्नास लाखांची खंडणी मागितली.
त्यांनतर वाल्मिक फंड याने सुनील ओस्तवाल यांना आमच्या गावात तुला प्लॉटिंग करायचे असेल तर मला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून विश्वास कोहकडे तसेच सुनील ओस्तवाल या दोघांनाही पन्नास लाखांची खंडणी मागितली. याबाबत शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कृष्णाजी कोहकडे (वय ५६) रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन पोलिसांनी वाल्मिक चिमाजी फंड याच्या विरुद्ध खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे पुढील तपास करत आहेत.