त्या पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक..

क्राईम

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हत्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता वैजापुरातही एका पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या. कैलाश गणपत चव्हाण (रा. बुरुडगाव रोड-अहमदनगर) असे मृत पुरोहिताचे नाव आहे.

वैजापूर तालुक्यातल्या हरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरातील गवळीबाबा मंदिरात पौराहित्य करणाऱ्या कैलाश चव्हाण यांची हत्या करण्यात आली आहे. काल दुपारी स्थानिक नागरिकांना मंदिराच्या शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कैलाश यांच्या मृतदेहावर शस्त्रान वार करण्यात आले असून मंदिरातही रक्ताचे डाग असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. याशिवाय मंदिर परिसरात सायकल, चिलीम, गांजाच्या झाडाची पानं आणि वशिकरणाचं शीर्षक असलेले काही साहित्यही आढळून आले आहेत. त्यामुळ आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

कैलाश चव्हाण यांचा खून भानामतीच्या आणि जादुटोण्याच्या कारणांवरूनच करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं आता पोलिसांनी घटनास्थळाची सर्व तपासणी केली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.