MIDC टप्पा क्रमांक 3 मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायात प्राधान्य द्या; अ‍ॅड शरद बांदल

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव गणपती MIDC तील टप्पा क्रंमाक 3 साठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने करडे आणि सरदवाडी येथील जमीन संपादित केली असुन त्यामध्ये आयएफबी (IFB) या कंपनी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन या कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायामध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना पुणे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड शरद बांदल यांनी आयएफबी कंपनी व्यवस्थापन, शिरुरचे तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक भूमिपुत्रास नोकरी व व्यवसायामध्ये प्राधान्य न दिल्यास युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अ‍ॅड बांदल यांनी दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे पंचतारांकित महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे. त्यानंतर नवीन आलेल्या एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मध्ये करडे, सरदवाडी, गोलेगाव आदी गावांचा समावेश आहे. एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मध्ये आयएफबी (IFB) कंपनीचे काम पूर्णत्वास आले असून यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या दृष्टीने कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय व नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या Local Persons Policy अंतर्गत काढलेल्या (G.R.-ELP-2008/C.No.93/Ind-6) परिपत्रकानुसार स्थानिक भूमिपुत्रांना औद्योगिक आस्थापनांमध्ये प्राधान्य देण्याच्या धोरणास अनुकूल आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलल्यास स्थानिकांच्या रोषातून सामाजिक शांततेला बाधा पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी तथा व्यवसायामध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे पुणे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड शरद बांदल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायामध्ये प्राधान्य न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ठाकरे गट युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.