कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील ‘महादेव ज्वेलर्स’ नावाने ज्वेलरीचे दुकान चालविणारा सोनार प्रताप परमार याने परिसरातील ब-याचशा नागरीकांकडुन सोने गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे दागीने दुरुस्त करण्यासाठी मोडण्यासाठी तसेच नवीन सोने खरेदीसाठी पैसे घेवुन सोन्याच्या दागीन्यांचा अपहार करुन नागरिकांची फसवणुक करुन पळुन गेला होता. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस पोलीस स्टेशनला ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये 150 ते 160 नागरीकांचे तक्रार प्राप्त झाले होते.

 

या प्रकरणाबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी मनिषा रामचंद्र नवले (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारेगाव येथील सोनार प्रताम परमार याच्या विरुध्द (दि 4) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सोनाराने रातोरात त्याच्या कुटूंबासह मोबाईल बंद करत सर्व सोने घेऊन पलायन केल्याने नागरीक चिंताग्रस्त झाले होते. बहुतांश तक्रारदार हे रांजणगाव MIDC मधील गोरगरीब कामगार असल्याने त्यांनी आर्थिक अडचणीमुळे त्याच्याकडे सोने गहाण ठेवले होते.

 

सदरचा गुन्हा दाखल होताच रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. आरोपी सोनार हा त्याच्या कुटूंबियांसह त्याच्या मुळगावी राजस्थामध्ये देखील राहण्यास नसल्याने आणि त्याने मोबाईल सुद्धा बंद करुन ठेवल्याने या आरोपीचा शोध घेवुन नागरीकांना त्यांचे दागीने परत मिळवुन देण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. रांजणगाव येथील तपास पथक सदर आरोपी बाबत गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत होते.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी सदर आरोपीचा (कटोसन, ता. कडी, जि. अहमदाबाद, राज्य गुजरात) येथे जावुन शोध घेतला. त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या एका कपड्याच्या दुकानाच्या उदघाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आरोपी सोनार प्रताप परमार याचे नाव आणि नवीन मोबाईल नंबर मिळुन आला. त्याच्या आधारे सुहास रोकडे यांनी सदर दुकानामध्ये नवीन कपडे खरेदीच्या बहाना करुन जावुन माहिती काढली असता सदरचे कपड्याचे दुकान हे आरोपी प्रताप परमार याचेच असल्याची खात्री झाली.

 

त्यानंतर सुहास रोकडे यांनी कपडे खरेदी झाल्यानंतर दुकानाच्या शेठला भेटायचे आहे असे सांगत दुकान मालकाला बोलवुन घेत ताब्यात घेतले असता सदर दुकानमालक हा आरोपी प्रताप परमार उर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपुत (वय 40) मुळ रा. चामुंडेरी, ता. जि. पाली, राज्य राजस्थान हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन वरील गुन्हयामध्ये (दि 12) डिसेंबर 2023 रोजी अटक केली. त्यानंतर आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता. त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्या दरम्यान आरोपीकडे तपास केला असता आरोपी प्रताप परमार याने फिर्यादीसह इतर 150 ते 160 नागरीकांची एकुण 100 तोळे सोन्याच्या दागीन्यांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

आरोपी प्रताप परमार याने नागरीकांकडुन घेतलेले सोन्याचे दागीने हे कारेगाव येथील “ओंकारबाबा ग्रामीण निधी लिमिटेड” या पतसंस्थेत तसेच काही दागीने हे त्याचा ज्वेलर्स दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ (रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. रांजणगाव पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपी प्रताप परमार याच्याकडुन एकुण 54 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 91 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने या गुन्हयाच्या तपासामध्ये जप्त केले आहेत. तसेच सदर आरोपीस (दि. 20) डिसेंबर पासुन न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुहास रोकडे हे करत आहेत.