सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय…तर हि बातमी नक्की वाचा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या शाळेत शिकावा हे सगळ्याच पालकांचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात आपली मुलं इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकली तर अजूनच चांगलं त्यासाठी सर्वचं पालक प्रयत्नशील असतात. शिरुर शहरातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी पालक जीवाचा आटापिटा करतात. परंतु शिरुर शहरातील दहा शाळांची सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. तसेच या दहा शाळांची मान्यता काढुन घेण्याची शिफारस पुणे जिल्हा परीषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे केली असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालताना काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथा पाचर्णे यांनी केली आहे.

 

याबाबत शिरुर येथे नुकतीच नाथा पाचर्णे यांनी पत्रकार परीषद घेत हि माहिती दिली. भारतीय बहुजन पालक संघ यांनी दि 7 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा परीषद पुणे यांच्याकडे शिरुर शहरातील दहा खाजगी शाळांच्या बेकायदेशीर तसेच नियमबाहय कारभाराच्या विरोधात तक्रार करत पुणे जिल्हा परीषद कार्यालयासमोर विद्यार्थी व पालक यांना बरोबर घेऊन धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हा परीषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष् प्रसाद यांनी शिरुर शहरातील 10 शाळांची आरटीइ (RTE) कायदा 2009 नुसार 12 क अन्वये चौकशी करण्यासाठी दि 24 मार्च 2022 रोजी समिती स्थापन केली होती.

 

सदर चौकशी समितीच्या माध्यमातून किसन दत्तोबा भुजबळ यांनी खालील दहा शाळांचा सखोल चौकशी करुन दि ११ जुलै २०२२ रोजी सुस्पष्ट अहवाल पुणे जिल्हा परीषदेच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांना सादर केला होता. त्यामध्ये शिरुर शहरातील खालील दहा शाळांचा समावेश आहे.
१) बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, रामलिंग रोड,शिरुर
२) विद्याधाम प्राथमिक शाळा, शिरुर
३)आर. एम. धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल,शिरुर
४) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल,शिरुर
५) पोदार इंटरनॅशनल स्कूल शिरुर
६) सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल, रामलिंग रोड, शिरुर
७) जीवन विकास मंदिर, शिरुर
८) गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल,विठ्ठल नगर, शिरूर
९) ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, बाबुराव नगर, शिरुर
१०) छत्रपती संभाजी शिक्षण संस्था संचालित, विजयमाला विद्यामंदिर, शिरुर

 

त्यानंतर दि 11 जुलै 2022 नंतर शासनाकडून वरील अहवालांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परीषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सदर सर्व शाळांना त्यांची बाजू मांडण्यास तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सुनावणी लावण्यात आली. परंतु सदर सुनावणी मध्ये सुद्धा शाळा दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने दि 29 मे 2023 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद पुणे यांनी आरटीइ (RTE) कायदा 2009 नुसार नियम 2011 मधील कलम 12 (ख) नुसार प्रत्येकी 5 सदस्यीय असलेल्या दोन समिती तयार केल्या त्यात समिती अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी, शिक्षण तज्ञ्, विस्तार अधिकारी व पत्रकार प्रतिनिधी असे सदस्य होते.

 

सदर दोन्ही चौकशी समित्यांनी चौकशी करुन सदर अहवाल शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड (प्राथमिक) जि. प .पुणे यांना दि 3जुलै 2023 ला सादर केले. सदर अहवालात शाळेच्या नियमबाह्य व बेकायदेशीररित्या कारभाराच्या अतिशय गंबीर बाबी निदर्शणास आल्या आहेत. त्या बाबी खालीलप्रमाणे

 

१) बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, रामलिंग रोड, शिरुर,या शाळेकडे शासन मान्यता मूळ प्रत, शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडिल परवानगी बाबत कोणतीही कागदपत्रे नाहीत. नियमानुसार शिक्षकांना वेतन दिले जात नाही. तसेच शाळेने पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने फी ठरवलेली आहे. सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ कायदा 2009 नुसार विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जिल्हा परीषद,पुणे, शिक्षणअधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली आहे.

 

२) विद्याधाम प्राथमिक शाळा, शिरुर या शाळेस शासन मान्यता आदेश नाही.शाळेस सन 2019-2022 या कालावधीसाठी स्वमान्यता उपलब्ध नाही. संस्था नोंदणी प्रमाणपत्र शाळेकडे नाही. मुख्याध्यापकपदी असलेली/केलेली नियुक्ती बेकायदा आहे. नियमाप्रमाणे शिक्षकांना वेतन दिले जात नाही. तसेच शाळेने सन 2018 पासून पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने फी ठरवलेली आहे व अशी फी वसूल करुन मोठी नफेखोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ (RTE) कायदा 2009 नुसार विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली आहे.

 

३) आर. एम. धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरुर या शाळेने सन 2014 पासुन पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे. तसेच अशी फी वसूल करुन कोट्यवधी रुपयांच्या FD रकमा लपवून त्यावर केवळ व्याज स्वरुपात ७९ लाख २५ हजार १३३ रुपये एवढे व्याज जमा करुन मोठी नफेखोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच विद्यार्थ्यांकडून इमारत निधी रक्कम गोळा करुन लोकवर्गणीतून शाळा इमारत बांधलेली असताना त्यावर रु. 12 लाख एवढे वार्षिक इमारत भाडे खर्च दाखवुन पालकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे संचालक मंडळ जाणीवपुर्वक मनमानी कारभार करत असल्याचे निरीक्षणास आलेले आहे. त्यामुळे आरटीइ (RTE) कायदा 2009 नुसार विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दि 3 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली आहे.

 

४) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, शिरुर या शाळेने शिक्षणाधिकारी प्राथ.जि. प .पुणे यांची इयत्ता 5 ते 8 वी या वर्गास मान्यता घेतलेली नाही. दि 1 जुन 2015 ते सन 2020-21 या कालावधीत शाळा मान्यता दिलेल्या जागेत सुरु न केल्याने शाळेची दिलेली मान्यता आपोआपच रद्द झाली आहे. शाळेने पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे. सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ (RTE) कायदा 2009 नुसार विविध तरतुदींचे उल्लंघन केलेने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

५) पोदार इंटरनॅशनल स्कूल, शिरुर या शाळेकडे शासन मान्यता प्रत उपलब्ध नाही. संस्था नोंदणी प्रमाणपत्र शाळेकडे नाही. शाळेने पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे. शिक्षकांना नियमप्रमाणे वेतन दिले जात नाही. एकाच पत्र जावंक क्रमांकाने शाळेस नमुना 2 प्रमाणपत्र दिलेली असल्याचे दिसून येत आहे. नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केलेने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

६) सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल, रामलिंग रोड, शिरूर, या शाळेने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी घेतलेल्या मान्यतेनुसार शाळा मान्यता घेतलेल्या जागे व्यतिरिक्त दुसऱ्या ठीकाणी सुरु केल्याने सादर शाळेची मान्यता २०१६ रोजीच रद्द झालेली आहे. शिक्षकांना नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. शिक्षक व कर्मचारी यांना नियमानुसार पगार दिला जातो अशी खोटी देऊन सीबीएसइ (CBSE) मान्यता संलग्नता मुदतवाढ मिळवली आहे. शाळेने पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे व वसूल केली आहे. सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केलेने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

७) जीवन विकास मंदिर, शिरुर या शाळेची इमारत ५० वर्षापेक्षा जास्त जीर्ण असल्याने तेथे विद्यार्थी बसविणे धोकादायक आहेत. शाळेत ८ वी च्या वर्गास मान्यता घेतलेली नाही. शाळा मान्यतेसाठी नमुना २ प्रमाणपत्रसाठी आवश्यक सुविधा शाळेकडे उपलब्ध नसल्याने आणि आरटीइ (RTE) कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केल्याने शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

८) गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल,विठ्ठल नगर, शिरुर या शाळेकडे शासनाकडून प्रथम मान्यता, तसेच नमुना २ प्रमाणपत्र उपलब्ध नाही. शाळेला फक्त १ ली ते ५ वी वर्गासाठी मान्यता असताना शाळेत अनधिकृतपणे ६ वी ते १० वी पर्यंत वर्ग सुरु आहेत. शिक्षकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. आरटीइ (RTE) कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केलेने शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

९) ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, बाबुरावनगर, शिरुर या शाळेने १९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या मान्यतेनुसार शाळा मान्यता घेतलेल्या जागे व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी सुरु केल्याने सादर शाळेची मान्यता २०२१ रोजीच रद्द झालेली आहे. तसेच हि शाळा अनधिकृतरीत्या सुरु आहे. शाळेने सन २०१८ ते २०२२ पर्यंत पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे आणि वसूल केली आहे. सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केलेने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

१०) छत्रपती संभाजी शिक्षण संस्था संचालित, विजयमाला विद्यामंदिर, शिरुर या शाळेकडे शासन मान्यता आदेश उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी यांनी दिनांक २२ फेब्रुवारी १९९१ अन्वये श्री. छ्त्रपती संभाजी शिक्षण संस्था शिरुर संस्थेस औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) व खेळाचे मैदान साठी १५ वर्षाकरिता नाममात्र भाड्याने दिलेली होती. त्याचे नुतनीकरण शासनाने केलेलं नाही. तसेच संस्थेस औद्योगिक संस्थेसाठी (ITI) जागा दिल्याने त्या ठिकाणी सदर शाळेस चालवता येणार नाही.

या शाळेने मान्यता मिळवताना शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांची मान्यता आदेशावर सही घेतली होती. परंतु त्यावेळेस सुनील कुऱ्हाडे हे अधिकारी शिक्षणाधिकारी या पदावरच कार्यरत नव्हते. तसेच इयत्ता ७ वी इयत्तेसाठी नैसर्गिक वाढ मिळवण्यासाठी एकाच जावंक क्रमांकाच्या पत्रानुसार दोन शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख आणि सुनील कुऱ्हाडे यांची सही घेतली.

परंतु त्याही वेळेस सुनील कुऱ्हाडे हे पदावर कार्यरत नव्हते याचा अर्थ शासकीय मान्यता मिळवताना गैरपद्धतीचा अवलंब झालेला असल्याचे दिसून येत आहे. दि २१ एप्रिल २०१५ च्या पत्रानुसार इयत्ता ८ वी ची मान्यता दर्जा वाढसाठी सन २०१३-२०१४ पासून शाळेने स्वयंअर्थसाहायित तत्वावर मान्यता घेतल्याचे कागदपत्रे मिळवली. परंतु त्या संदर्भात शासन निर्णयच शाळेकडे नाही. शाळा शासनाकडून मान्यता घेण्याच्या अगोदरच सुरु केली आहे. शिक्षकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही.शाळेने पालकांची कार्यकारी समिती (EPTA) विहित पद्धतीने स्थापन न करता नियमबाह्य पद्धतीने बेकायदा फी ठरवलेली आहे व वसूल केली आहे.

सदर शाळा नियमबाह्य पद्धतीने कारभार करत असल्याने आरटीइ (RTE) कायदा २००९ नुसार विविध नियमांचे व तरतुदींचे उल्लंघन केल्याने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस जि.प.पुणे शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दि ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

 

शिरुर शहरातील नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेबाबत अनेक गंभीर बाबी पुणे जिल्हा परीषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दहा शाळांची आरटीइ (RTE) कायदा २००९ नुसार १२ (क) अन्वये स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या दिनांक ६ जुलै २०२२ च्या अहवालानुसार आणि पुणे जिल्हा परीषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दि २९ मे २०२३ रोजी आरटीइ (RTE) कायदा २००९ नुसार नियम २०११ मधील कलम १२ (ख) नुसार ५ सदस्यांच्या दोन समिती यांनी जिल्हा परीषद पुणे यांना सादर केलेल्या अहवालानुसार मांडलेली आहे.

त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच माझा उद्देश आहे. तसेच शासनाने वेळेत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. तसेच सदर नियमबाह्य कारभार करणाऱ्या शाळांवर शासनाने शासकीय प्रशासक बसवावेत आणि नियमाप्रमाणेच विद्यार्थ्यांकडून फी घेतली जावी आणि गैरकारभार करणाऱ्या संस्था चालक,संचालक मंडळ व सबंधित मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जावी. तसेच अनेक वर्षांपासून पालकांचे आर्थिक शोषण करून नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या गोळा केलेले फी स्वरूपातील पैसे पालकांना परत मिळावेत.

नाथा पाचर्णे
राज्य संयोजक
भारतीय बहुजन पालक संघ महाराष्ट्र