माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणूक करणारा मोकाट

मुख्य बातम्या

माजी सैनिक संघटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होऊन महिला उलटून देखील शिक्रापूर पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने संतप्त माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

वरुडे (ता. शिरुर) येथील सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या सारिका शिंगाडे यांनी गावातील सदाशिव देवराम शिंगाडे, सीताबाई लालू शिंदे व राधाबाई रामचंद्र कोळपे यांच्याकडून काही जमीन विकत घेत खरेदीखत केलेले असताना देखील आरोपींनी सदर जमीन अन्य व्यक्तीला विकून सारिका शिंगाडे यांची फसवणूक केल्याची घटना घडल्याने सारिका सीताराम शिंगाडे (वय ५२) रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादिवरुन पोलिसांनी सदाशिव देवराम शिंगाडे रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे, सीताबाई लालू शिंदे रा. शिंदेवाडी मलठण (ता. शिरुर) जि. पुणे व राधाबाई रामचंद्र कोळपे रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले मात्र गुन्हा दाखल होऊन 1 महिना उलटून सुद्धा पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही व आरोपी मोकाट असल्याने माजी सैनिक संघटना आक्रमक झाली आणि माजी सैनिकांच्या संघटनेने शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा आणला.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव धुमाळ, रावसाहेब आदक, सुरेश उमाप, सुदाम भुजबळ, जालिंदर ढमढेरे, एकनाथ महाजन, परशूराम शिंदे, बाबू जाधव, विवेकानंद घाडगे, प्रभाकर सोनवणे, पोपट महाजन, धोंडीबा जगताप, संपत जाधव, भिमाजी काळे, चंद्रकांत कदम, भाऊसो कळमकर, सुनील वाळके, बबन फलके, नीता पोतले, अनुजा पावसे, माजी सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष अनिल सातव, आनंद गोसावी, कल्याण लगड, मारुती कुटे, इंद्रपाल सिंग यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून आरोपींना तातडीने अटक केले नाही तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा देखील दिला असून दरम्यान शिक्रापूर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करुन आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.