शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्रापुर पोलिस खडबडून जागे झाले आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ आरोपी राहुल झगडे याला अटक केली असुन त्याला 16 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

परंतु शिक्रापुर पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत संबंधित पिडीत महिलेने 15 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के या सर्वांना निवेदन पाठवले होते. तसेच या निवेदनात शिक्रापुर पोलिस आरोपीला मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्रापुर पोलिस खडबडून जागे झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी राहुल झगडे याला अटक केली. त्यानंतर आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 16 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपीला अटक केल्यानंतर संबंधित पिडीत महिलेने 15 ऑगस्ट 2023 रोजी आत्मदहन करण्यात येणारे आत्मदहन तात्पुरते स्थगित केले आहे.