गडी एकटा निघाला…मंगलदास बांदल पुन्हा मैदानात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकारणात अनेकांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आपण सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसुन सध्यातरी “एकला चलो रे” हिच भुमिका असल्याचे बांदल यांनी सांगितले. तसेच ज्यांनी मला जेल मध्ये पाठवलं त्यांना वाटतं असेल की मी घाबरुन जाईल, पण मी लाल मातीतला पैलवान आहे. त्यामुळे विरोधकांना चितपट करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुमारे बावीस महिन्यांच्या करावासानंतर पैलवान मंगलदास बांदल यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. त्यानंतर काही दिवसांनी ते करागृहाबाहेर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. आज शिरुर येथील पत्रकार परिषदेत बांदल नक्की काय भुमिका मांडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. परंतु बांदल यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. बांदल म्हणाले राजकारणात मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी बाप्पुसाहेब थिटे यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आहे. तुम्हाला वार करायचा ना समोरुन करा ना पाठीवर कुठं वार करता. राजकारण करताना समोरासमोर विरोध करा.

आज शिरुर तालुका एका वेगळ्या दिशेला चालला असुन बापुसाहेब थिटे यांच्या नंतर या तालुक्याला कधीही मंत्रीपद मिळालं नाही. आम्हाला संघर्ष नवीन नाही. माझ्यावर 2007, 2008, 2009 मध्ये दाखल झालेले आर्थिक गुन्हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना बाहेर काढले आणि मला जेलमध्ये पाठवलं मग तोपर्यंत सरकार काय झोपल होत का असा सवाल बांदल यांनी केला. त्यांना 2021 मध्ये असा काय साक्षात्कार झाला की मंगलदास बांदल गुन्हेगार आहे. माझ्याकडे लायसन्स असलेलं वेपण पोलिस स्टेशनला जमा असतानाही घाणेरडं राजकारण करुन मला अडकवलं असा आरोप बांदल यांनी केला. यावेळी युवा नेते निखील बांदल, ॲड आदित्य सासवडे, निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे, बाबू पाटील ढमढेरे, मयूर ओस्तवाल, निलेश खरबस,अनिकेत गायकवाड, दिपक मगर यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.