शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या कार्यालयात येत नसल्याने मोठी वर्दळ असणाऱ्या या ऑफिसपुढे शासकिय वेळेत नागरिक मोठी गर्दी करत असून तलाठी कार्यालय सताड बंद असल्याने नागरीकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

या परिसरातील नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, संजय गांधी निराधार योजनेचे अहवाल, पिक पाहणीची मंजूरी या कामांसाठी नागरीक तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारुन बेजार झाले असून त्यांची वरील कामे मोठया प्रमाणावर रखडली आहे. त्यामुळे या कार्यालयात तलाठी दाखवा अन् बक्षीस मिळवा अशी उपहासात्मक टिका शिरुर तलाठी कार्यालयाच्या परिसरात होत आहे.