निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुख्य बातम्या

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी व्यक्त केले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

निमोणे (ता. शिरुर) येथे “निमोणे आयडॉल्स व्हाट्स अँप गृप” च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळयाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन पन्हाळकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले दहावी आणि बारावीच्या दरम्यानचा काळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ असतो. त्यामुळे यावेळी घेतलेले निर्णय आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात .

या कार्यक्रम प्रसंगी शिरुर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहल चरापले प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परिक्षेत विद्यार्थीनींचा निकालाचा वाढता टक्का प्रेरणादायी आहे. मुलींचे आई-वडील बारावीनंतर मुलीच्या लग्नाची घाई करतात. परंतु मुलीच्या लग्नापेक्षा तिच्या शिक्षणाला प्राधान्य द्या. तिला स्वतःच्या पायावर उभी राहु द्या. तसेच बऱ्याच वेळा सोशल मिडियाचा वाढता गैरवापर याविषयी आम्ही शाळा व कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. पण शिरुर तालुक्यात “निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप” च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात हि कौतुकास्पद बाब आहे.

यावेळी गृपच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी व कला, क्रिडा, स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या ४० विद्यार्थ्याचा पालकांसमवेत सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मान सोहळ्याचे हे आठवे वर्ष होते. यावेळी सरपंच संजय काळे, सहायक फौजदार शंकर चव्हाण, ज्ञानेश्वर काळे, आनंदराव ढोरजकर, संतोष काळे, दादासाहेब गायकवाड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमोणे आयडॉल्स गृपचे बाळासाहेब गायकवाड, प्रा. गौतम दळवी, शामराव जगताप, संजय गाडेकर, नवनाथ गव्हाणे, रोहिदास काळे, प्रकाश दुर्गे, मच्छिंद्र बांदल, अनिल कांबळे, शिवाजी जाधव यांनी योगदान दिले. प्रा. गौतम दळवी यांनी सुत्रसंचालन केले.